निवडणूक पाहून जनतेला खूश करणाऱ्या योजना आणल्या:’लाडकी बहीण’ योजनेवरून शरद पवार यांचा महायुती सरकारला टोला
गेले काही दिवस महाराष्ट्रभरात फिरत आहे. अनेक सभा घेतल्या जनतेशी संवाद साधला यातून मला असे जाणवले की, 6 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत लोकं शांत होते, आता परिस्थिती वेगळी आहे, असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खूश करण्याच्या योजना आणल्या. 1500 रुपये महिलांना देऊन महायुतीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा काहीना काही परिणाम होणार. पण निवडणुकीवर फार परिणाम होणार नाही. कारण महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. राज्यातील महिला होताय बेपत्ता शरद पवार म्हणाले की, राज्यातील बेपत्ता महिला अन् मुलींचा आकडा पाहिला तर तो खूप मोठा असल्याचे दिसून येते. एका बाजूने लाडकी बहिण म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचा होत आहे, त्या बेपत्ता होताय याचा पत्ता लागत नाही. आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मांडत आहोत. शेतकरी नाराज शरद पवार म्हणाले की, सोयाबीन, कापूस उत्पादन शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना हे सरकार काहीच करत नाही, यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. संविधान बदलण्याची ताकद भाजपत नाही शरद पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळविण्यासाठी 274 खासदारांची गरज आहे. परंतु मोदी आणि शाह यांनी मात्र लोकसभेला 400 पार चा नारा दिला. हे बहूमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे. यावरुनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा, ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना रोखले. देशाची सत्ता भाजपची आहे, परंतू घटना बदलण्याची ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही, असे रोहित पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी म्हटले आहे.