राजकारण कारल्याच्या भाजीसारखे कडू झाले आहे:संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुती आघाडीवरही केली टीका

“राजकारण कारल्याच्या भाजीसारखे कडू झाले आहे,” असे म्हणत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व पक्षांवर जोरदार टीका केली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत संभाजीराजे बोलत होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवरही टीका केली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आजचे राजकारण आजवर कधीच बघितले नव्हते. येथे खोके, गद्दारी, आणि बेईमानी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे की शिवसेना काँग्रेसशी युती करणार नाही. मग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत कसे गेले? खुर्चीसाठी असा निर्णय घेतला असेल, तर ते गद्दारी नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संभाजीराजे पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी 70 हजार कोटींचा आरोप करत होते. आज त्याच अजित पवारांसोबत सरकार आहे. सोनिया गांधी यांच्या परदेशीचा मुद्दा घेऊन शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले, नंतर पुन्हा त्यांच्यासोबतच गेले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण तसे आपण वागतो का? आमच्याकडे शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आहे. पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र तलवार होते. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ‘पेन’ शस्त्र आपल्यासोबत आहे. महात्मा फुलेंची सामाजिक रचना, बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि या पेनच्या शाईमधून शिवाजी महाराजांचे विचार लिहिले जातात. महाराष्ट्र इतरांना दिशा देणारे राष्ट्र आहे. पण, या सर्व प्रस्थापितांनी महाराष्ट्र गिळून टाकला आहे. सदाभाऊ खोत यांच्यावर देखील संभाजीराजे यांनी टीका केली आहे. तो सदाभाऊ खोत काहीही बोलतो, त्याला उत्तर देणार तो कुत्रा आहे म्हणतो, हा प्रचार आहे का? असा सवाल उपस्थित केला. महायुती 1500 रुपये देतात, महाविकास आघाडी 3 हजार देणार म्हणतात, त्यापेक्षा महिलांना रोजगार द्या, असे म्हणत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

  

Share