मिस्कीन मळ्यातील पुलाचे काम रखडले; रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात:तब्बल दीड वर्षापासून काम ठप्प; अर्धवट कामावर लाखोंचा खर्च‎

अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने मागील वर्षी केलेल्या तारकपूर ते गंगा उद्यान रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. विनापरवाना गतिरोधक केल्याने ते काढण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतर झालेले खड्डे अद्यापही बुजवण्यात आले नाहीत. तसेच, रस्त्यावरील मिस्कीन मळा येथील पुलाचे काम अद्यापही ठप्पच आहे. या अर्धवट कामापोटी तब्बल ४८ लाख रुपयांचे बिल अदा झालेले आहे. मात्र, त्यानंतरही ओढ्यावर नवीन पुलाचे काम करण्यास मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी, पुलावरील रस्ता खराब होऊन खड्ड्यांमुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. तारकपूर ते गंगा उद्यान रस्त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील वर्षी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ठेकेदाराने रस्त्याचे डांबरीकरण केल्यावर चारच महिन्यात त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मिस्किन मळा परिसरात नाल्यावरील पुलाचे कामही अद्यापही ठप्प आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातही होत आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा ठिकाणी गतिरोधक करण्यात आले होते. त्याला परवानगी नसल्याने काही गतिरोधक काढण्यात आले. मात्र, त्यानंतर तेथील रस्त्याची दुरुस्ती न केल्याने नवीन रस्ता खराब झाला आहे. मिस्किन मळा येथील जागेबाबत तकीया ट्रस्ट व महापालिका यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे. उच्च न्यायालयात मनपाच्या विरोधात निकाल लागला होता. सदर रस्ता व पूल या वादग्रस्त जागेतून जात असल्याने त्यावर हरकत घेण्यात आली होती. मात्र, मनपा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे कामातील अडथळा दूर झाला आहे. लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल रस्त्याशेजारील जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे काम रखडलेले होते. याबाबत तोडगा काढण्यात येत आहे. ठेकेदारालाही तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले असून तेथेही दुरुस्ती करण्यात येईल. – मनोज पारखे, शहर अभियंता, महापालिका सकाळपासून या रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वार या खड्ड्यात घसरून पडले. या ठिकाणी खड्डा मोठा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा खड्डा लक्षात यावा यासाठी दोन काठ्यांवर पिशवी लावून निशाण केले. जेणेकरुन इतर वाहनधारकांना ते लक्षात येऊन, ते घसरून पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया खड्डा दर्शवण्यासाठी शक्कल लढवणाऱ्या नागरिकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

  

Share