पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. खेवलकरांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना कोर्टात आणण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या आज देखील वकिलाच्या कोटमध्ये कोर्टात उपस्थित होत्या. प्रांजल खेवलकर आणि इतर चार आरोपींची पोलिस कोठडी आज संपली होती. पुणे पोलिसांनी आणखी तीन दिवस पोलिस कोठडीची मागणी केली आहे. याचे कारण सांगताना असे सांगण्यात आले की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचे पोलिसांनी म्हटले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. तसेच त्यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवला आणि ‘असा माल पाहिजे’ अशा प्रकारचा मेसेज खेवलकर यांनी एका आरोपीला केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात केली होती. पूजा सिंह नामक महिलेला प्लांट करण्यात आले – आरोपींचे वकील आरोपींच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रकरणातील पूजा सिंह नामक महिलेला प्लांट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीय राजकीय निगडीत असल्याने खेवलकर यांना त्रास दिला जात असल्याचे देखील आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले. तसेच प्रांजल खेवलकर यांनी पोलिस कोठडीत वाढ न करण्याची मागणी केली आहे. कारण पोलिसांनी या पूर्वी दोन वेळा प्रांजल खेवलकर यांना पोलिस कोठडीत ठेवले होते, तसेच त्यांचा मोबाइल व लॅपटॉप पोलिसांनी तपासला होता, मग आता आणखी वेळ कशासाठी मागत आहात, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता.