प्रयागराजच्या 6 हजार हेक्टरवर उभारला उ.प्र.चा 76 वा जिल्हा:महाकुंभ… 45 दिवस, 45 कोटी भक्तांच्यासुरक्षेसाठी 37 हजार जवान, एआय कॅमेरे
कुंभनगरी | हा सध्या उत्तर प्रदेशातील ७६ वा जिल्हा आहे. पण, तो तात्पुरता. तो फक्त १ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत अस्तित्वात असेल. कारण तो जगातील सर्वात मोठ्या कार्यक्रमासाठी बनवला गेला. हा कार्यक्रम म्हणजे १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणारा महाकुंभ. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ होत असला तरी या वेळचे आयोजन अनेक प्रकारे पूर्णपणे वेगळे आहे. हा पूर्णत: डिजिटल महाकुंभ आहे, ज्यामध्ये परंपरेपासून ते अध्यात्मापर्यंत सर्व काही डिजिटल ठेवले आहे. चार तालुके आणि ६७ गावांसह ६ हजार हेक्टरमध्ये पसरलेली संपूर्ण कुंभनगरी तुमच्या मोबाइलवर पाहता येईल. यासाठी गुगल आणि महाकुंभ मेळा प्राधिकरण यांच्यातील करारानुसार महाकुंभ नेव्हिगेशन मॅप तयार करण्यात आला आहे. यामध्ये घाट, मंदिरे, आखाडे, प्रसिद्ध संत, रस्ते, शिबिरे यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. १३ जानेवारी ते ३१ मार्च या ४५ दिवसांत स्नानाच्या विशेष तारखांना ५ ते १० कोटी लोक आणि एकूण ४५ कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात २४०० कॅमेरे बसवले आहेत. यापैकी ३२८ एआय सज्ज आहेत, जे चेहरे ओळखून गुन्हेगारांवर नजर ठेवतील. संपूर्ण कुंभनगरीमध्ये डिजिटल आणि बहुभाषिक टच स्क्रीन बोर्ड लावण्यात आले असून, त्यावरही तक्रारी करता येतील. त्यांना सामोरे जाण्यासाठी ५६ पोलिस ठाणे, १५५ चौक्या आणि ६० अग्निशमन केंद्रे निर्माण केली आहेत. येथे तैनात ३७ हजार सैनिक २४ तास डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडले जातील. या वेळी महाकुंभावर २५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या वेळी महाकुंभाची तीन रूपे आहेत… डिजिटल: जत्रेत तुम्ही जिथे उभे असाल तिथून तुम्हाला हरवलेल्या आणि सापडलेल्यांची तक्रार नोंदवता येईल. यासाठी डिजिटल केंद्रे तयार केली अाहेत. सर्वत्र डिजिटल डॅशबोर्ड असतील, जे महाकुंभाच्या प्रत्येक पैलूचा लाइव्ह स्टेटस देतील. एक महाकुंभ ॲप आहे ज्यावर अलर्ट आणि नोटिफिकेशन्स मिळतील. जेथे गर्दी वाढेल तेथे कॅमेरे त्याची गणना करून ताबडतोब नियंत्रण कक्षाला अलर्ट करतील. उपग्रहाद्वारे नदीतील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण केले जाईल. सुरक्षा: महाकुंभ १० झोन, २५ सेक्टरमध्ये विभागला गेला आहे, जेथे १० प्रकारची सुरक्षा ऑपरेशन्स केली जातील. महिलांसाठी ३ पोलिस लाईन्स, ३ पोलिस स्टेशन आणि १० गुलाबी चौक्या असतील. उत्तराखंड अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, राष्ट्रीय अग्निशमन सेवा, गोवा, कोलकाता, महाराष्ट्राचे जल पोलिस, २५ हायटेक जेट स्की पोलिस तैनात असतील. ७०० बोटींवर पानबुडे तैनात असतील. यासाठी २००हून अधिक स्थानिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वच्छताः ४५ कोटी लोकांसाठी १.५ लाख शौचालये आणि युरीनल स्टेशन्स बसवण्यात आली आहेत. क्यूआर कोडद्वारे स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जाईल. मौनी अमावस्येच्या मुख्य स्नानासाठी ५ कोटी लोकांसाठी स्वतंत्र शौचालये बसवण्यात आली आहेत. प्रत्येक १० शौचालयामागे एक सफाई कामगार, प्रत्येक १० सफाई कामगारांमागे एक पर्यवेक्षक आणि प्रत्येक २० मुताऱ्यांसाठी एक सफाई कामगार असेल.
१० कोटी भाविक रेल्वेगाड्यांनी येण्याचा अंदाज गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ होतो. यात सहभागी होण्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांतील साधू-संत दाखल झाले आहेत. २०१३ मध्ये झालेल्या शेवटच्या महाकुंभाला २० कोटींहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. या वेळी दुप्पट व्यवस्था करण्यात आली आहे. १९०० हेक्टरमध्ये पार्किंग आहे. १० कोटींहून अधिक भाविक रेल्वेने येण्याची शक्यता आहे. ७ हजार बसेस धावणार आहेत.