पुण्यात औद्योगिक विकासाला चालना:दर तीन महिन्यांनी उद्योगांसोबत आढावा; पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर

पुणे जिल्ह्यामध्ये अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा यासाठी उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. उद्योगांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यालाही प्रशासनाचे उच्च प्राधान्य असून कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास उद्योगांनी खुलेपणाने, निर्भिडपणे त्याची माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. एमसीसीआयए येथे आयोजित औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासाला व अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम उद्योग क्षेत्र करते असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असून त्यादृष्टीने शासन काम करत आहे. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री २.०) पोर्टल या एकाच व्यासपीठावरुन उद्योगांना सर्व परवानग्या, सुविधा देण्याची व्यवस्था तयार करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणुकीला व उद्योग उभारणीला चालना मिळणार आहे. विभागात उद्योग उभारणी, त्यांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, असामाजिक तत्त्वांकडून येणारे अडथळे आदींच्या अनुषंगाने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध असून दर तीन महिन्यांनी उद्योगांसोबत आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले असल्याने आता खासगी क्षेत्रात उद्योग उभारणीला चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात खासगी क्षेत्रातही रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत. त्या अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणांच्या अनुषंगाने शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यात विकसित होत असलेला बाह्य वर्तुळाकार मार्ग तसेच अन्य सुविधांमुळे बाह्य क्षेत्रातही उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या अनुषंगाने अधिसूचना निघताच तात्काळ समृद्धी महामार्ग तसेच पुणे बाह्य वर्तुळाकार मार्गाच्या धर्तीवर गतीने भूमीसंपादन करण्यात येईल. त्याशिवाय पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून अशा प्रकारे बाह्य व अंतर्गत वाहतूक कोंडीवर गतीने मार्ग काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

  

Share