पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अखेर मोठे खिंडार:संग्राम थोपटे यांचा समर्थक पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश
काँग्रेस पक्षाला भोर विधानसभा मतदारसंघात अखेर मोठे खिंडार पडले. भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. संग्राम थोपटे यांच्याबरोबरच तीन तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी देखील आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून माझ्या वडिलांच्या कार्य काळापासून आम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली आणि काँग्रेसचा विचार जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचला. मात्र माझ्यावर ही वेळ काँग्रेसने आणली असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मला वारंवार निर्णय घेण्याचे आवाहन करत होते. मात्र मी निर्णय घेऊ शकत नसल्याचे मी त्यांना सांगत होतो. मी एका पक्षाच्या विचाराशी बांधील होतो. मात्र, अखेर त्याच पक्षाने माझ्यावर ही वेळ आणली असल्याचा आरोपही थोपटे यांनी केला आहे. काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला – थोपटे राजकारणात संघर्ष करायला करावाच लागतो, त्यातून आम्ही कधीच डगमगलो नाही. माझ्या वडिलांना देखील कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. मी देखील संघर्ष केला. त्यातून सहकार संस्था असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सर्वच ठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला. आमच्यावर पक्ष सोडण्याची ही वेळ आणली असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे. भाजप प्रवेशामागचे नेमके कारण काय? संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा कारखाना अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केले होते. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्याला मदत मिळण्यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास संग्राम थोपटे यांना राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. संग्राम थोपटे हे 2002 ते 2003 या काळात भोर पंचायत समितीचे उपसभापती होते. 2007 ते 2024 या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिलेले आहेत. याशिवाय ते याच काळात भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी लढवली होती. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. यानंतर 2014 आणि 2019 अशी सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते. कोण आहेत संग्राम थोपटे?