खराडी येथील मानवी तस्करी संदर्भातील प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) व्हावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यांनी मानवी तस्करीच्या संदर्भात खराडी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाने थेट पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाने लिहिलेल्या पत्रात काय? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. सदर प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी. हा प्रकार महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांवर गंभीर आघात करणारा आहे. त्यामुळे न्यायोचित, वेळेत आणि सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, असेही रूपाली चाकणकर यांनी पत्रात नमूद केले आहे. महिला आयोगाने कोणत्या गोष्टींची चौकशी करायला सांगितले?