पुण्यात कारगिल युद्धात सहभागी झालेल्या मुस्लीम जवानाच्या कुटुंबाला अज्ञात जमावाने त्रास दिल्याचा आणि धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जमावाने कुटुंबावर बांगलादेशी रोहिंग्या असल्याचा आरोप करत नागरिकत्वाचे पुरावे मागितले आणि न दिल्यास ‘बेकायदेशीर घुसखोर’ ठरवण्याची धमकी दिली. दरम्यान, या कुटुंबाने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलेत. या घटनेवरून रोहित पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. देशात पोलिस यंत्रणा असताना या संघटनांना हा अधिकार कुणी दिला? या संघटनांचा पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असे रोहित पवार म्हणालेत. ही घटना उघडीकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 1971 च्या युद्धासह कारगिल युद्धात भाग घेतलेल्या मुस्लिम जवानाच्या कुटुंबाची बांगलादेशी असल्याच्या संशयावरून काही कडव्या उजव्या विचाराच्या संघटना धाकदडपशाहीने चौकशी करत असतील, त्यांच्याकडील आधारकार्ड, पॅनकार्ड खोटे असल्याचे सांगत त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देत असतील आणि कथित सिव्हिल ड्रेसमधील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर याचे कदापि समर्थन करता येणार नाही. देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस काही पाऊले उचलत असतील तर त्याला कुणाचा विरोध नाही, परंतु कडव्या उजव्या विचारांचे गुंड अशाप्रकारे धुडगूस घालत असतील तर हे मात्र चुकीचे आहे. देशात पोलिस यंत्रणा असताना या संघटनांना हा अधिकार कुणी दिला? या संघटनांचा पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. नेमके प्रकरण काय? पुण्यातील चंदननगर परिसरातील माजी सैनिक हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबाला अज्ञात व्यक्तींच्या जमावाने त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित ठरवून भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे मागितली आहेत. तसेच पुरावे न दिल्यास त्यांना बांगलादेशी रोहिंग्या आणि बेकायदेशीर घुसखोर ठरवण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ही घटना 26 जुलै रोजी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, 30 ते 40 अज्ञात लोकांनी अचानक त्यांच्या घरी घुसले आणि त्यांच्यावर नागरिकत्वाचे कागदपत्र दाखवण्याची जबरदस्ती केली. “कागदपत्रे दाखवली नाहीत तर तुम्हाला बांगलादेशी रोहिंग्या घोषित करू,” अशी धमकी त्यांनी दिली. हकीमुद्दीन शेख हे भारतीय लष्करातील 269 इंजिनिअर रेजिमेंटचे माजी नाईक हवालदार असून त्यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धात भाग घेतला होता. हकीमुद्दीन सध्या त्यांच्या मूळगावी राहतात, मात्र त्यांचे विस्तारित कुटुंब 1960 पासून पुण्यात राहत आहे. “मी 16 वर्षे देशसेवा केली. आमचा संपूर्ण परिवार भारतीय आहे. तरीही आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ का आली?” असा सवाल हकीमुद्दीन शेख यांनी केला आहे. हकीमुद्दीन शेख त्यांचे बंधू इर्शाद शेख यांनी सांगितले की, “आमचे काका नईमुल्लाह खान आणि शेख मोहम्मद सलीम यांनी 1965 व 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. आमचा परिवार देशसेवेचा वारसा घेऊन चालत आहे.” पोलिसांची भूमिका संशयास्पद? कुटुंबाने स्पष्ट केले की ही घटना पोलिसांनी नव्हे तर जमावाने घडवली. “लोक ओरडत घरात घुसले, कागदपत्रे मागू लागले. पोलिस व्हॅन जवळच होती. एका अधिकाऱ्याने हस्तक्षेपाचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष मदत झाली नाही,” असा आरोप इर्शाद शेख यांनी केला. घटनेनंतर चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या रक्षणाऐवजी रात्री सुमारे १२ वाजता घरातील सर्व प्रौढ पुरुषांना पोलिस ठाण्यात नेले आणि पहाटे ३ वाजेपर्यंत तिथेच थांबवले, असा आरोप कुटुंबीयांनी केला. यासंदर्भात बोलताना पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्या रात्री परिसरात पोलिसांची उपस्थिती असल्याची पुष्टी केली. “संशयित बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पडताळणीचा भाग म्हणून कुटुंबाला ओळखपत्र सादर करण्यास सांगितले होते,” असे ते म्हणालेत.