राहुल देशपांडे यांना पहिला ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’:’मंगेशकर कुटुंबियांची शाबासकीची थाप, मी स्वतःला भाग्यशाली समजतो’
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त यंदाच्या वर्षापासून ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कारा’ची सुरुवात करण्यात आली. हा पहिला पुरस्कार यंदा देशपांडे यांना देण्यात आला आहे. राहुल देशपांडे यांना लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक -अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यावर राहुल देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल देशपांडे म्हणाले, मंगेशकर कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे, हे एका संगीत साधकासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यामुळे ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ या पुरस्कारासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो. सर्वोत्तमाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा ध्यास प्रत्येक संगीत साधकाचा असतो, माझाही तोच प्रयत्न आहे. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, लता दीदी आपल्यातच आहे, अशीच भावना मंगेशकर कुटुंबियांची आणि चाहत्यांची होती. त्यामुळेच गेली दोन वर्षे आम्ही कोणताही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला नाही. जिथे जिथे संगीत आहे, तिथे तिथे लता दीदी असणारच. त्यामुळेच आजच्याही कार्यक्रमात लता दीदी उपस्थित आहे, अशी माझी खात्री आहे.