शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यसंत:कसब्याच्या प्रचार सभेत राज ठाकरे यांची टीका

गेल्या पाच वर्षातील राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणे पाहता किळस येते आहे. कोण कोणाच्या मांडीवर बसतेय, याचा थांगपत्ता लागत नाही. मते एकाच्या नावाने मागायची आणि सत्ता वाटेल त्या पद्धतीने उपभोगायची, अशी स्थिती सध्या आहे. हे असेच चालू राहिले, तर येत्या काळात महाराष्ट्राचे आणखी वाटोळे होईल. फोडाफोडीच्या या राजकारणाचे शरद पवार हे आद्यसंत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या हाताला (काँग्रेसला) आपण निवडून देणार आहात का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचेय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, अशी साद ठाकरे यांनी घातली. कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. फडके हौद चौकात झालेल्या सभेवेळी मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर व अनिल शिदोरे, उमेदवार गणेश भोकरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे व ऍड. गणेश सातपुते, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, महिला सेनेच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर, शहर संघटक प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, शहर सचिव रवी सहाणे आदी उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, कसबा आणि कोथरूड माझ्यासाठी महत्वाचे आहे. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मनसेची स्थापना केली होती. त्यामुळे या मतदारसंघाशी माझे घट्ट नाते आहे. कसब्याला ऐतिहासिक वारसा आहे. माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत सोन्याचा नांगर फिरवून हे शहर वसवले होते. आज अस्ताव्यस्त वाढलेले हे शहर समस्यांनी ग्रस्त आहे. मात्र, आपण आपला इतिहास, स्वाभिमान विसरलो आहोत. केवळ जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन चालणार नाही, तर इतिहास समजून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहर कसेही वाढत चालले आहे. त्याला कोणतेही नियोजन नाही. केवळ मेट्रो आणि उड्डाणपूल झाले म्हणजे शहराचा विकास होत नाही. येथील आमदार, खासदार निवडून येतात. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. नियोजन नाही. परिणामी शहराचा बोजवारा उडाला आहे. आपण शिक्षित-अशिक्षित आहोत का यापेक्षा आपण सुज्ञ आहोत का, याचा विचार होणे ही आजच्या काळाची गरज आहे. कडवट हिंदुत्व, मराठीपण आपण कधीही सोडता कामा नये. इतर राज्यांप्रमाणे आपली प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

  

Share