राज-उद्धव युतीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया:हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न, पवार कुटुंबाच्या मनोमिलनावरही स्पष्टच बोलले
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट युती करणार असल्याचे बोलले जात आहे. एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, महाराष्ट्रासमोर आमचे भांडण किरकोळ आहेत, महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यात काहीच अडचण नाही. राज ठाकरेंच्या या विधानाला उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील ठाकरे बंधूंच्या युतीविषयी विचारण्यात आले होते. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीविषयी प्रश्न विचारला, यावर ते म्हणाले, हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. याबाबतची माहिती मला नाही. मी त्यांच्याशी अद्याप बोललो नाही. त्यामुळे यावर भाष्य करता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात एआयच्या वापरावार देखील भाष्य केले. कृषीचे प्रश्न आपल्यासमोर प्राधान्याने असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवार कुटुंबही एकत्र येणार का? असा सवाल शरद पवारांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागते. आताच मी ऊसाच्या उत्पादन वाढीसंदर्भात बोललो. या प्रश्नावर आम्ही वर्षानुवर्ष काम करत आहोत. पण नुसते काम करून चालत नाही. शेवटी सरकारलाही या कामात समाविष्ट करून घ्यावे लागते. यासाठी सरकारमधील प्रतिनिधींशी संवाद साधावा लागतो. यात काहीही चुकीची बाब नाही. मुंबई जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो – युगेंद्र पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संभाव्य युतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार म्हणाले, दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची केवळ चर्चा आहे. मात्र, दोघे एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला मलाही आवडेल. परंतु, तो दोन मोठ्या नेत्यांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा व पक्षांतर्गत प्रश्न आहे. मुंबई जिंकण्यासाठी त्यांचा प्रयत्न असू शकतो, असेही युगेंद्र पवार म्हणाले आहेत. युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पवार कुटुंब एकत्रच आहे. बाकी मोठे निर्णय हे शरद पवार किंवा अजित पवार घेतील. आम्ही लहान मुले त्यावर बोलू शकत नाही. वरिष्ठांनी घेतलेले निर्णय सर्वांना स्वीकारावे लागतात. शरद पवार व अजित पवार जे निर्णय घेतात ते सर्वांना शंभर टक्के मान्य असतात.