भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात राजदंडला देखील स्पर्श केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी एका दिवसासाठी निलंबित केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोज निलंबित केले तरी सभागृहात आवाज उचलणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक दिवसासाठी निलंबित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. भाजप महायुतीचे सरकार माज आलेले आहे. या सरकारची वास्तविकता आज समोर आली आहे. यांचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात. त्यांना कपडे हे घेऊन देतात. 2014 च्या आधी लोणीकर उघडाच फिरत होता. जो शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलेल त्याला निलंबित करणे आणि जे अपमान करतात त्यांना सन्मानाने बसवायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. नेमके काय म्हणाले होते लोणीकर कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात. या कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन मीच दिले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेत लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या. पाच वर्षांचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच-दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका, असा टोला त्यांनी गावकऱ्यांना लगावला. तसेच, मी एक, दोन, तीन वेळा पाहिलं, त्यानंतर गावावर फुली मारील, असा थेट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नाना पटोलेंकडून माफी मागण्याची मागणी सभागृहात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर जात राजदंडाला देखील स्पर्श केला. या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वारंवार त्यांना जागेवर बसण्याची विनंती केली. मात्र, पटोले मागे हटले नाही. त्यानंतर अखेर अध्यक्षांनी त्यांना निलंबित करत सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक एकिकडे नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना पटोले यांच्या कृती वरुन काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात आजपर्यंत अनेकदा आपण असे गोंधळ पाहिले आहेत. मात्र, अध्यक्षांचीच चुकी असल्यासारखे पटोले अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या सभागृहात असे कधीच झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.