रामदासांनी तरुणांची मोट बांधून शिवरायांना पाठिंबा दिला:अमित शहांच्या विधानाने वाद; शिवबांच्या गुरु केवळ जिजाऊ -सभाजीराजे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी समर्थ रामदास यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असे ते म्हणालेत. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा हा दावा फेटाळत माता जिजाऊ याच शिवरायांच्या एकमेव गुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी शिराळा मतदारसंघात प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी समर्थ रामदास यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडला. समर्थ रामदास स्वामी यांचे पाऊल पडलेले ही एक पवित्र भूमी आहे. रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला होता, असे ते म्हणालेत. संभाजीराजे छत्रपती यांचा आक्षेप अमित शहा यांच्या विधानावर महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यांचे विधान धुडकावून लावले आहे. अमित शहा यांनी काय विधान केले हे मला ठावूक नाही. पण समर्थ रामदास त्यांच्या ठिकाणी मोठे संत असतील. पण गुरू म्हणून त्यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना माता जिजाऊ यांचा आदर्श व मार्गदर्शन मिळाले होते. समर्थ रामदास स्वामी यांचे महत्त्व वेगळे असले तरी माता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या एकमेव गुरू होत्या हेच सत्य आहे, असे ते म्हणाले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचीही हरकत दुसरीकडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही या मुद्यावरून अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. तरुणांना एकत्र करून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला असे म्हणणे ही केवळ एक भाकड कथा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, 1642 ते 1672 या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संदर्भात समर्थ रामदास यांचे नाव कुठेही अस्सल कागदपत्रांत नोंदवलेले नाही. त्यामुळे रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांकडे जाऊन पाठिंबा द्यायला सांगितले ही एक भाकडकथा आहे. या भाकडकथेच्या आधारावर भारताच्या गृहमंत्र्यांनी बोलणे हे चुकीचे आहे, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

  

Share