कॉपी सेंटरच्या नावाखाली ११ वी व १२ वी प्रवेशासाठी २० हजार रुपये शुल्क आकारले जात असलेल्या कोळसा (ता. सेनगाव) येथील विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रवेश द्यायचा किंवा नाही हा आमचा अधिकार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसह त्यांच्यासोबत आलेल्यांना परत पाठविले. या संदर्भात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या अकरावी वर्गात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे. त्यानुसार एका विद्यार्थ्याचा कोळसा (ता.सेनगाव) येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वी साठी प्रवेशासाठी नंबर लागला. त्यानुसार सदर विद्यार्थी प्रवेशासाठी गेला असता त्याला २० हजार रुपये प्रवेश शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गरजू विद्यार्थ्याने उधार उसणवार करून रक्कम उभी केली होती. मात्र त्यानंतर प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमान गाढवे यांनी विद्यालयात जाऊन प्राचार्य बेंगाळ यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी प्रवेश द्यायचा किंवा नाही हा आमचा अधिकार आहे, परिक्षा शुल्क २० हजार रुपये कशाचे घेताय? याची विचारणा केली असता, तुम्ही विचारणारे कोण? असा उलट सवाल केला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्याला प्रवेश देण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या ठिकाणी प्राचार्य बेंगाळ व छावा संघटनेचे पदाधिकारी हनुमान गाढवे यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओची एकच चर्चा सुरु झाली आहे. या महाविद्यालयाच्या संदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केल्याचे हनुमान गाढवे यांनी सांगितले. तर संस्थेचे अध्यक्ष भास्कर बेंगाळ यांनी तो विद्यार्थी आमच्याच विद्यालयात दहावीला होता. त्याची वागणुक योग्य नसल्यामुळे त्याला प्रवेश नाकारल्याचे सांगितले.