मनमोहनसिंग यांच्या सरकारने भगवा आतंकवाद शब्दाचा वापर करुन हिंदू समाजाला दहशतवादी ठरवले होते. त्याच वेळी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा असल्याची आठवण आली नव्हती का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद शब्द न वापरता सनातनी आतंकवाद असा शब्द वापरण्याचा उल्लेख केला होता. यावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाचा फटकारले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मालेगाव प्रकरणाच्या निकालानंतर आपल्या सर्वांच्या हे लक्ष्यात आले असेल की, काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशाप्रकारे नॅरेटिव्ह तयार केले होते. ते पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. वास्तविक 1990 च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि 2000 मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या. यातील काही घटना अमेरिकेत तर काही युरोपमध्ये देखील घडल्या. भारतात देखील अनेक आतंकवादी घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांचे धागेदोरे पाकिस्तान पर्यंत जात होते. त्यातूनच एक इस्लामिक टेररिझम अशा पद्धतीची भावना तयार झाली होती. वास्तविक ही भावना भारताने तयार केलेली नव्हती. मात्र जगामध्ये ती तयार झाली होती. भारतामध्ये या नॅरेटिव्हचा आपल्या व्होट बँकेवर विपरीत परिणाम होतोय, अशा प्रकारे काँग्रेसच्या लक्ष्यात आले. वास्तविक सर्व मुसलमानांना कोणीही आतंकवादी ठरवलेले नव्हते. मात्र, सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाने षड्यंत्र रचले आणि हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद अशा पद्धतीने शब्द तयार करून अनेक लोकांना पकडण्यात आले होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्व हिंदू राष्ट्रप्रेमी, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या स्वतःच्या सहकाऱ्यांना सांगावे, असे प्रत्युत्तर देखील फडणवीस यांनी दिले आहे. वास्तविक चव्हाण ज्या मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये ते होते. त्याच सरकारने भगवा आतंकवादाचा नॅरेटिव्ह तयार केला होता. त्या वेळी त्यांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा असल्याचे लक्षात आले नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भगवा असो, हिंदू असो किंवा सनातनी असो, यांच्यात कोणताच भेद नाही. हे सर्व एक आहेत आणि हे सर्व राष्ट्रप्रेमी, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वांनी चर्चा करून कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जी घटना घडली, त्याबद्दल सर्वांच्याच मनामध्ये रोष होता. त्यामुळे अजित पवार आणि आम्ही सर्वांनी चर्चा करून त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कृषी खाते हे मामा भरणे यांच्याकडे देण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सध्या तरी दुसरा कोणताही बदल राज्य मंत्री मंडळामध्ये होईल, अशी कोणतीच चर्चा नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची शक्यताही फेटाळून लावली आहे. सर्व मंत्र्यांना कडक इशारा यापुढे अशा पद्धतीने कोणाचेही वर्तन समोर आले तर आम्ही ते खपवून घेणार नाही. याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सर्वांना सांगितले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हे सर्वांसाठीच संकेत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आलो आहोत. जनतेची सेवा करत असताना आपण काय बोलत आहोत? आपण काय करतोय? आपले वर्तन कसे आहे? या सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्याच्यावर अंकुश असायलाच हवा, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. भविष्यात काहीही खपवून घेणार नसल्याचे तसेच कारवाई करणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे.