संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीवर शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया:म्हणाले – आरोपीला पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्याची मागणी अधिक योग्य ठरली असती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत येथील आमदाराला मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांकडे केली होती. त्यांचा रोखा धनजंय मुंडे यांच्याकडे होता. त्यांच्या या मागणीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांनी मोठे विधान केले आहे. एखाद्या खून प्रकरणात आरोपी सापडेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका, असे म्हणण्यापेक्षा आरोपी पकडायला ज्या काही यंत्रणा लावायच्या आहेत, त्या लावल्या पाहिजेत, मागणी संभाजीराजे यांनी केली असती, तर ती अधिक योग्य ठरली असती, असे शंभुराज देसाई म्हणाले. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड हा गुन्हा दाखल असूनही खुला फिरतोय, असे म्हणत संताप व्यक्त केला होता. तसेच खूनाचा तपास होईपर्यंत आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री न करण्याची अजित पवारांकडे विनंती केली होती. यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना उपरोक्त विधान केले. काय म्हणाले शंभुराज देसाई ?
एखाद्या खून प्रकरणात आरोपी सापडेपर्यंत येथील आमदाराला मंत्री करू नका, असे म्हणण्यापेक्षा आरोपी पकडायला ज्या काही यंत्रणा लावायच्या आहेत, त्या लावल्या पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली असती, तर ती अधिक योग्य ठरली असती, असे शंभुराज देसाई म्हणाले. कोणत्याही खून प्रकरणात सर्व यंत्रणा काम करत असतात. पोलिस प्रशासन तपासाचे सर्व मार्ग शोधत असते. मी सुद्धा अडीच वर्षे गृहविभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. पोलिस प्रशासन संतोष देशमुख खून प्रकरणतील सर्व धोगेदोरे तपासतील आणि या प्रकरणामागील सूत्रधार, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला शोधून काढतील, असा दावाही शंभूराज देसाई यांनी केला. फडणवीस, शिंदे, पवार माहिती देतील
शंभुराज देसाई मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाविषयी बोलताना म्हणाले की, त्याबाबतची अधिकृतपणे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच देतील. परवापासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी केवळ उद्याचाच दिवस आहे. या हिवाळी अधिवेशनासाठीच आम्ही सर्व आमदार नागपुरात दाखल झालो असल्याचे देसाई म्हणाले.

  

Share