सनातन धर्माने भारताचे वाटोळे केले आहे. सनातन नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. सनातनी लोकांना विकृत म्हणायला घाबरले नाही पाहिजे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बोलताना केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना कथित भगव्या दहशतवादावर भाष्य केले होते. भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून त्यांनी नव्या वादाला फोडणी दिली. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी उपरोक्त मोठे विधान केले. नेमके काय म्हणाल जितेंद्र आव्हाड? सनातन धर्माने भारताचे वाटोळे केले. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत. ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम केले, महात्मा फुलेंचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीमायच्या अंगावर शेण, गोटे सगळे टाकले, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉ. आंबेडकरांना पाणी पिऊ दिले नाही, शाळेत जाऊ दिले नाही. त्या सनातन धर्माविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाऊल टाकत, मनुस्मृती जाळली. मनुचा निर्माता सनातनी परंपरेतून झाला. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी लोक विकृत आहेत, असे म्हणायला कुणीच घाबरले नाही पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. नेमके काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? माझी व भाजप व काँग्रेसच्या लोकांना नम्र विनंती आहे की, कृपया भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. कारण, भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज (भगवा) आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व वारकरी पंथाचा रंग आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कुणीही राजकीय लेबल लावू नका. म्हणायचेच असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. रोहित पवारांनी केले चव्हाणांचे समर्थन दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, ‘भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, भावनेचा आणि परंपरेचा विषय असल्याने भगवा शब्दाला दहशतवादाशी कुणीही जोडू नये’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडलेल्या या भूमिकेत चूक काय? योग्य भूमिकेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपा आणि शिंदे साहेबांच्या पक्षातील लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करावे याचा आधी अभ्यास केला पाहिजे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाचे आता देशाच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे. तर पुण्यातही सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.