संजय हा श्रीकृष्णांसोबत नाही, धृतराष्ट्रासोबत होता:राऊत यांना उद्धव ठाकरेंना धृतराष्ट्र म्हणायचे होते का? शहाजी बापू पाटलांचा खोचक टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाभारतातील पात्रांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णाची उपमा दिली होती. तर स्वत: संजय असल्याचे म्हटले होते. यावरून शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. महाभारतातील संजय हा श्रीकृष्णासोबत नव्हता, तर धृतराष्ट्रासोबत होता. त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असे म्हणायचे होते का? असा खोचक टोला शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच त्यांनी संजय राऊतांना महाभारत पुन्हा वाचण्याचा सल्ला दिला. काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी काल ठाकरे गटात प्रवेश करत घरवापसी केली. या पक्षप्रवेशावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा दिली. तर आपण संजय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कुरूक्षेत्रावरील महायुद्धही आपणच जिंकणार असा विश्वास देखील संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. यावरून शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. नेमके काय म्हणाले शहाजी बापू पाटील? महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता, तर आंधळ्या धृतराष्ट्राजवळ बसलेला होता, त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असे म्हणायचं होते का? असा टोला शहाजी बापू यांनी लगावला. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे. इतिहासाचा निट अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही शहाजी बापू यांनी दिला. मोदींवर टीका करण्यापेक्षा निवडून यायचे बघा विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुंतत आहेत, हे मला कळत नाही. संजय राऊत हे ट्रम्प, मोदी, चीन, जपान यांच्यावर का बोलत आहेत? गेल्या दहा वर्षांत मोदी साहेबांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली, त्यामुळे शेअर बाजार हा इतर देशाच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला. मोदी साहेबांवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका, आधी वॉर्डात निवडून यायचे बघा, असा घणाघात शहाजी बापू यांनी राऊतांवर केला. कोकाटेंचे वक्तव्य खेळकर संवाद शहाजी बापू पाटील यांनी यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. मंत्री कोकाटे यांचा स्वभाव हा खेळकर आहे, त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर केलेला हा खेळकर संवाद होता. तो काही त्यांच्या अंतःकरणातला संवाद नाही, असे शहाजी बापू म्हणाले. नेमके काय म्हणाले होते संजय राऊत? काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा दिली. संजय राऊत म्हणाले की, महाभारतातील तीन पात्रे आता मातोश्रीवर उपस्थित आहे. उद्धवजी म्हणजे श्रीकृष्ण…मी संजय आहेच…सहदेवही आहेत, पण सहदेव श्रीकृष्णाच्या जवळ आहे. सहदेवांच्या येण्याने नव्या कुरूक्षेत्रावरचे महायुद्ध आपण जिंकणार आहोत.

  

Share