शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा केल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याशी कॉलवर बोलताना अयोध्या पौळ यांनी संजय राठोड सारख्या माणसाला चपलेने मारले पाहिजे असे वाक्य वापरल्याचे ऐकू येत आहे. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याला बोलताना अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांना चपलेने मारण्याचा उल्लेख केला आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.) या ऑडिओ क्लिपनुसार, संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल केला तेव्हा अयोध्या म्हणाल्या कोण बोलत आहे जरा लवकर बोला. त्यावर राठोड नामक कार्यकर्त्याने संजय राठोड यांच्या पोस्टबद्दल विचारणा केली. त्यावर अयोध्या पौळ यांनी आक्रमक होत भाष्य केले. अयोध्या पौळ म्हणाल्या, तुम्ही ज्यांचे नाव घेतले ते नाव माझ्या पोस्टमध्ये आहे का? पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते वाचायची अक्कल नाही का? अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा, अहो, ते सगळे चित्रा वाघ यांनी काढले न. असल्या माणसाला चपलेने बडवले पाहिजे. संजय राठोड सारख्याला भरचौकात चपलेने मारले पाहिजे. मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला ज्यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले आहेत, त्यांच्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भरचौकात चपलेने बडवले पाहिजे, असे अयोध्या पौळ यांनी म्हटले आहे. अयोध्या पौळ यांनी केलेली पोस्ट काय? अयोध्या पौळ यांनी रविवारी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संजय राठोड यांचा वारकरी वेशभूषेतील एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, अनैतिक संबंध ठेऊन निष्पाप जीवाचा गर्भपात करून आणि एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे नीच, हरामखोर लोक गळ्यात तुळशी माळा घालून हातात चिपळ्या घेऊन वारकरी असल्याचे दाखवून समस्त वारकरी सांप्रदायाचा अपमान करतात. असल्या लोकांचा जाहीर निषेध, अशी त्यांनी पोस्ट केली आहे. अयोध्या पौळ यांनी केलेल्या याच पोस्टवरून संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने त्यांना कॉल केला होता. परंतु, आपल्या पोस्टमध्ये संजय राठोड या व्यक्तीचे नावच नसल्याचा दावा अयोध्या पौळ यांनी केला. तसेच पुढे बोलताना आक्रमक होत त्यांनी त्या कार्यकर्त्यालाच खडेबोल सुनावले.