संजीवराजे नाईक निंबाळकरांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी:जुन्या घरांना टार्गेट करणे चूक; रघुनाथराजे निंबाळकर यांची टीका
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला होता. काल सकाळी सहा वाजेपासून मुंबई, पुणे, आणि फलटणमधील घरी आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता आज सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाकडून निंबाळकरांच्या घरात तपास सुरु करण्यात आला आहे. यात फलटण आणि पुण्यातील घराचा देखील समावेश आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. काल सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील घरी दाखल झाले होते. तेव्हापासून अजूनही पथकाकडून झाडाझडती सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा घातला. तेथील तपासणी आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. रामराजेंनी ठेवले होते स्टेटस आयकरच्या छाप्याबाबत कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. काल सकाळी सहा वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू होती. फलटणमध्ये मात्र यामुळे खळबळ उडाली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संबंधित असलेल्या सगुणामाता कन्स्ट्रक्शन , कुरवली ॲग्री फूड्स कंपनी आणि अरेस्टा मॅजिशियन कंपनी तरडगाव तसेच गोविंद मिल्क या कंपन्यांशी संबंधित कागदपत्र केंद्रीय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहेत. या छाप्यानंतर त्यांनी व्हॉटसअपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत होते. त्यात म्हटले आहे, कृपया गर्दी करू नका. खात्याला काम करू द्या. काळजी नसावी. अजित पवारांसोबत परत येण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जोरदार इन्कमिंग झाले होते. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांची साथ सोडून अनेक जण शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यामध्ये फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचा मुलगा अनिकेतराजे नाईक निबंळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने संजीवराजे हे फलटणचे राजकारण संभाळतात. मात्र, भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना कंटाळून संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. महत्त्वाचे म्हणजे रामराजे यांच्या पाठींब्यानेच हा प्रवेश झाला होत, असे म्हटले जात होते. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. मात्र आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवार गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत नाकारले तिकीट संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांना उमेदवारीसाठी संधी न देता शरद पवार गटाने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर फलटण-कोरेगावच्या जागेवर भाजपाने दावा केला होता. यासाठी भाजपाने महायुतीत या जागेची मागणी केली होती. पण या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने त्यांनीही दावा केला होता. अखेर फलटण-कोरेगावची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी मिळाली. परंतु विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर हे नाराज होते. त्यामुळे पुन्हा एकदा ते अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा होती.