संतोष देशमुख हत्या प्रकरण:राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती; बाळासाहेब कोल्हे पाहणार काम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दुहेरी चौकशी करण्याची घोषणा केली. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढू असेही आश्वासन दिले. त्यापाठोपाठ विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगला भेट दिली. सरकारने कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येणार नाही, आता देशमुख कुटुंब एकटे नाही, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत, असे शरद पवार म्हणाले. तर धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला, तर दुसरीकडे परभणीत संविधान अवमानाविरोधात आंदोलनानंतर कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरीही शरद पवार आणि अजित पवार यांनी भेट दिली. तपासामध्ये वैयक्तिक लक्ष देईन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १३ दिवस उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजता मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले. ते गावातून बाहेर निघत असताना एकच गोंधळ उडाला. गावातील तरुणांनी पवार यांच्या वाहनाला गराडा घालून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी केली. दरम्यान, या हत्येप्रकरणी सरकार दुहेरी चौकशी करणार असून सूत्रधाराला सोडणार नाही, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मी वैयक्तिक लक्ष देईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. संतोष देशमुख यांचा शनिवारी तेरावा होता. दुपारी 12 वाजता खासदार शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेवुन सांत्वन केले. नंतर दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. याच वेळी गावातील तरुणांनी त्यांच्या वाहनाला गराडा घातला. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, त्यांना मंत्रिपद देऊ नका, जनतेचे म्हणणं ऐकून घ्या, धनंजय मुंडे यांनी पक्षपात केला, त्यांनी बीड जिल्हा नासवून टाकला, असे संतप्त तरुणांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. सूत्रधाराला सोडणार नाही या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल. घटनेमागील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मी वैयक्तिक लक्ष देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या प्रकरणावर आमचे बारकाईने लक्ष आहे. तर विधानसभेत या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. या हत्येची दोन समित्यांमार्फत चौकशी सुरू आहे. एक आयजी दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत व दुसरी न्यायाधीशांमार्फत चौकशी करत आहोत, तपासात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घेऊ, असे ते म्हणाले. मुंडे, वाल्मीक कराडांवर बोलणे टाळले उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सायंकाळी मस्साजोग गावातून परतत असताना गावकऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी पवार यांनी बोलणे टाळले. पवार यांना गावकऱ्यांनी थांबण्याचे आवाहन केले. मात्र हेलिकॉप्टरने लातूरला पोहोचायचे आहे, असे सांगून ते निघून गेले.

  

Share