बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचे सांगत दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. या अर्जावर न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून दोष मुक्त करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर आमदार सुरेश धस यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी न्यायालयाचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. हे निरीक्षण कोणालाही वाचवू शकणार नाही. दोन्ही नेते शोलेच्या कॉईनसारखे आहेत, छापा पण हेच काटा पण हेच, असा टोला धस यांनी लगावला आहे. न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणानुसार, वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून, कट रचून त्यांची हत्या केली. वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. गेल्या 10 वर्षात त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत, तर बीड जिल्हा न्यायालयात 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणे, फोनवरुन धमकावणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, तसेच महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब, डिजिटल एव्हिडन्स, फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मीक कराडला दोष मुक्त करण्यात येत नाही. वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे आता निरीक्षणातून स्पष्ट होत आहे. आमदार सुरेश धस काय म्हणाले? सुरेश धस म्हणाले, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे याची आकाला सवयच लागली होती. आवादा कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यांनतर कोर्टाने दोन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आले. ही खंडणी वसूल करताना त्यात संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केला आहे. ही गोष्ट माननीय न्यायालयाच्या लक्षात आली आहे. मारायला आलेले लोक यांचेच आहेत. कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचे विशेष मकोका कोर्टाने म्हणटले. दोषमुक्तीचा अर्ज या केसमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला. केस लांबवण्याचे प्रयत्न झाले. मकोका कोर्टाने नोंदवलेले महत्वाचे निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचे म्हटले. अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचे आजचे निरीक्षण महत्वाचे हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही. न्यायालयाने कोणते निरीक्षण नोंदवले बीड न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. वाल्मीक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचाही कोर्टात उल्लेख. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि 11 गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत. वाल्मीक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वाल्मीक कराड हाच कटाचा मुख्य सूत्रधार, असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला, म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचला, अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केला. खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणे आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असे न्यायालयाने म्हटले. वाल्मीक कराडचा संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सहभाग आणि सदस्यत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल/फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथम दर्शनी पुरावे आढळले आहेत. कराड गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे जो मृत देशमुख यांच्या हत्येसह कटात सहभागी. पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे सिद्ध केले आहे. तसेच अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनीही डिस्चार्ज अर्जाला विरोध केला आहे.