संतोष देशमुख हत्येची चौकशी सीआयडी पोलिस महासंचालक करणार:मुख्यमंत्री फडणवीस सविस्तर निवेदन करणार सादर, तपासाची कार्यक्षमता गृहविभाग ठरवणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सविस्तर निवेदन विधानसभेत सादर करणार असल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणी कोणते अधिकारी तपास करणार यावर गृहविभागाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर या तपासाची कार्यक्षमता काय असणार हे देखील आता गृह विभागच ठरवणार आहे. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन आरोपी फरार आहेत. पवनचक्की खंडणी वादातून ही हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवारांच्या पक्षाशी संबंधित आहेत. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर देखील या हत्येचा आरोप केला जात असून कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सगळ्या वसुलबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करत आरोपींना शिक्षा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे समोर आले आहे. यात देशमुखांच्या मृत्यूचे कारण हे ‘हॅमरेज शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे देण्यात आले आहे. देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सादर केला आहे. संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आल्याची चर्चा सुरू होती. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडल्याने ही चर्चा सुरू झाली होती. डोळे जाळल्याला दुजोरा नाही संतोष देशमुख यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झालेला असून त्यांच्या शरीरावर मुकामार दिसत आहे. त्यांचे डोळे काढणे किंवा लेझरने डोळे जाळणे या आरोपाला शवविच्छेदन अहवालात दुजोरा देण्यात आलेला नाही. पाठ, डोके व संपूर्ण शरीरावर मुकामार व जखमा दिसून आल्या आहेत.

  

Share