जून महिन्यात राज्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. केवळ मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात दमदार पाऊस झाल्याने सर्व भिस्त आता जुलै महिन्यावर उरली आहे. मे महिन्यातील धुवाधार पावसानंतर जून महिन्यात पहिले दोन आठवड्यांत पावसाने विश्रांती घेतली. २६ मेनंतर गायब झालेला पाऊस १५ जूनच्या आसपास राज्यात पुन्हा दाखल झाला. त्यातही या पावसाचा जोर कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रावर अधिक होता. त्यामुळे या विभागात पावसाची स्थिती चांगली राहिली आहे. दुसरीकडे विदर्भ तसेच मराठवाड्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली. विदर्भात या काळात थोडाफार पाऊस झाला असला तरी मराठवाडा मात्र कोरडाठाक राहिला आहे. या भागातील धरणांची देखील फारशी स्थिती बरी नाही. या दोन्ही विभागातील बहुतांश जिल्हे अवर्षणाच्या छायेत आहेत. राज्यात २९ जूनपर्यंत सरासरीच्या ७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. यात कोकण विभागात सरासरीच्या १५ टक्के अधिक, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात सरासरीच्या उणे ४० टक्के, तर विदर्भात उणे १६ टक्के पाऊस झाला आहे. मुंबई उपनगरात सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस बरसला कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या ८७ टक्के कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या ८७ टक्के अधिक, पुणे १०५, रायगड ६०, ठाणे ६७, पालघर १३७, नाशिक ११८, नंदुरबार ६२ टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. तर सातारा सरासरीच्या २१ टक्के अधिक आणि मुंबईत २५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास उणे १६, रत्नागिरी १९, सांगली १५, मुंबई उपनगरात सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस बरसला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाने ओढ दिली असून सरासरीच्या उणे ६४ टक्के पाऊस या भागात बरसला आहे. अंदमान निकोबार बेटांवर ९ दिवस आधी पाऊस दाखल जून महिना हा मान्सूनच्या प्रवासाचा काळ असतो. संपूर्ण देश काबीज करण्यासाठी त्याला ८ जुलैपर्यंतचा कालावधी लागतो. त्यामुळे सहसा जून महिन्यात पाऊस हा उण्यातच असतो. यंदा मात्र अंदमान निकोबार बेटांवर तो ९ दिवस आधी, केरळमध्ये आठ दिवस आधी, तर महाराष्ट्रात तो १३ दिवस आधीच दाखल झाला होता. ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापणारा मान्सून यंदा ९ दिवस आधीच २९ जूनला त्याने देश व्यापला आहे. दक्षिण भारतात उणे २, तर पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात उणे १७ टक्के पाऊस झाला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगड, दिल्ली, अंदमान निकोबार आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात अतिरिक्त पाऊस झाला आहे. पाणीसाठा ४५ टक्क्यांवर राज्यातील सर्व धरणांचा मिळून पाणीसाठा ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यात कोकण विभागात ५७.४३, पुणे ५२.४१, नाशिक ४४, छत्रपती संभाजीनगर ३४.५७, अमरावती ४३.९५, नागपूर ३१.८२ टक्के साठा आहे. कोकणात ३ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट बांगलादेश किनारपट्टीलगतचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत असून, याच्या प्रभावामुळे विदर्भ, तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात ३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.