भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा-ढिवरखेडा येथील रहिवासी व गोंदी येथील गटग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेश खुशाल हत्तिमारे यांनी लाथा बुक्क्यांनी गोंदी येथील एका 80 वर्षीय वयोवृद्धाला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवार, 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. पीडित वृद्धाचे नाव श्रावण सखाराम कांबळे असे असून, त्यांची शेतजमीन ढिवरखेडा शिवारात आहे. ही जमीन सन 2023 मध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अतिक्रमणमुक्त केली होती. दरम्यान, सरपंच हत्तीमारे अधूनमधून त्या जागेवर जात असत. बुधवारी, ६ जुलै रोजी सकाळी कांबळे हे याच जागेवर गेले असता, हत्तीमारे यांनी “तू इकडे का आलास?” असे विचारत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कांबळे जमिनीवर पडले, ज्यामुळे त्यांच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. हत्तीमारे यांनी त्यांना पुन्हा मारण्याची धमकीही दिली, असे कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. या प्रकरणी कांबळे यांनी पालांदूर पोलिसांकडे तोंडी फिर्याद दिली. पोलिसांनी सदर गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्याचे नमूद करत विविध कलमान्वये नोंद घेतली आहे. पुढील तपास सहायक फौजदार गायधने करत आहेत. हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनले आहे, कारण आरोपी गणेश हत्तीमारे हे लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष असून त्यांची स्थानिक व जिल्हा तसेच राज्यस्तरावरच्या राजकीय घडामोडींचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे स्थानिक नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.