सावरखेडा शिवारात पिकअप अन् दुचाकीची धडक:अपघातात हिंगोली जिल्हा परिषदेच्या सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याचा मृत्यू

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर पिकअप वाहन व दुचाकीची धडक होऊन झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ही घटना रविवारी ता. १६ रात्री सात वाजताच्या सुमारास घडली आहे. अशोक कामाजी खोकले (५०) असे मयताचे नाव असून ते हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्रशासन अधिकारी खोकले हे आज सकाळी त्यांच्या कुटुंबियांसह दुचाकी वाहनावर त्यांच्या गावी भुरक्याचीवाडी (ता. कळमनुरी) येथे गेले होते. त्या ठिकाणी काम आटोपून सायंकाळी हिंगोलीकडे परतत होते. रात्री सात वाजताच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सावरखेडा शिवारात हिंगोलीकडून कळमनुरीकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अशोक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अन् ते रस्त्यावरच पडले. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, जमादार अनिल डुकरे, खोकले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सावरखेडा गावकऱ्यांच्या मदतीने अशोक यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या अपघातात त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. संतोष टारफे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, गिरीराज बोथीकर, नागेश बोलके यांच्यासह आदिवासी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मयत अशोक खोकले हे आदिवासी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष होते. त्यांच्यावर सोमवारी ता. १७ सकाळी दहा वाजता भुरक्याचीवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

  

Share