परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर स्वतः बाजू मांडत आहेत. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली होती. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. नेमके प्रकरण काय? परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात होतीच. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत याचिका दाखल केली आहे. यात कुटुंबीयांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मांडत आहेत. एका पोलिस अधिकाऱ्यासह 2 पोलिस कर्मचारी निलंबित परभणी हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, त्यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी (35) यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाल्यानंतर, परभणीमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. घटनेच्या सुमारे दोन महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली होती.