मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठे आश्वासन दिले आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनात आणखी वाढ केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुलुंड येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. योजना सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला आणि कोर्टात गेले. मात्र, “लाडक्या बहिणींनी अनेक सावत्र भावांचे मनसुबे उधळले,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. सध्या योजनेचा लाभ अडीच कोटी महिला घेत आहेत. काही भावांनी बहिणींच्या नावानेच पैसे घेणे सुरू केले. काहींनी पुरुष आहे हे लक्षात येईल म्हणून मोटारसायकलचा फोटो लावला. असे सगळे शोधून काढले असून त्यांचे पैसे थांबवले आहेत. मात्र, अशा प्रत्येकाची पडताळणी करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पात्र महिलांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र, घुसखोरांना बाहेर काढा, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सक्षमीकरणावर भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची प्रशंसा करत फडणवीस यांनी महिलांना अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक म्हटले. “बेटी बचाओ, बेटी पढाओ”पासून सुरू झालेला प्रवास “लखपती दीदी”पर्यंत पोहोचला आहे. राज्यात २५ लाख “लखपती दीदी” तयार झाल्या असून एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात महिला बचत गटांसाठी “उमेद मॉल” उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात १० मॉल सुरू होतील. महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड १०० टक्के होते, याचेही त्यांनी कौतुक केले. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार शक्य नाही महायुती सरकारने राज्यात “केजी ते पीजी”पर्यंत शिक्षण मोफत केले आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील महिला थांबणार नाहीत. महिला थांबल्या नाहीत तर राज्याचा विकासही थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेत थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता नाही. तरीही विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतात, असेही फडणवीस म्हणाले.