दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमधून मुंबईकडे रवाना:राज्यातील 184 पर्यटक मुंबईत सुखरूप परतणार; एकनाथ शिंदे यांनी दिला निरोप
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर आज दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले. या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आश्वस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली. तसेच तत्पूर्वी शिंदे यांनी या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटोसेशनही केले. राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान आज संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 येथे पोहोचणार आहे. पुलवामा नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये युएईचा एक पर्यटक आणि नेपाळचा एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत. महाराष्ट्रातील सहा पर्यटक या हल्ल्यात ठार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातून आलेल्या शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी झाले. तो त्याच्या मधुचंद्रासाठी इथे आला होता. लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.