राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ असे म्हटले. त्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘शहा सेना’ असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनचा यांच्यावर झालेला परिणाम – नाना पटोले एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले, या सरकारचा वास्तविक-पणा, महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल आणि मातृ भाषेबद्दल या सरकारचे मत काय? हे आता स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनचा यांच्यावर झालेला परिणाम अद्यापही उतरलेला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी – जितेंद्र आव्हाड पुण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा का दिली? हे मला समजले नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर कसे आहात ऐवजी, केम छो? असे विचारायचे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. स्वतःच्या पायावर धोंडा टाकून दुसऱ्याला खुश करणार असेल तर तुम्हाला मुबारक हो, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जय गुजरातच्या घोषणेमुळे आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेची सारवासारव केली जात असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी दिला ‘जय गुजरात’चा नारा:अमित शहांपुढे फोडले वादाला तोंड; विरोधी पक्षातील नेत्यांचा ‘लोटांगण घातल्याचा आरोप’ राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उद्या विजयी मेळावा साजरा करत आहेत. मात्र या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर