“शरद पवारांनी 160 जागांसंदर्भात केलेला दावा हा वराती पाठीमागून घोडे असल्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी सगळ्या पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण तेव्हा कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटे बोलावे, यालाही एक सीमा असते,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘मंडल यात्रे’वर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांच्या 160 जागांच्या दाव्यासंदर्भात बोलताना म्हणाले की, हा दावा म्हणजे वरातीमागे घोडे…अशी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएम संदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. कोर्ट हे एकमेव व्यासपीठ आहे, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होते. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते. मोदींना घाबरत नसाल, तर… पवारांना आवाहन प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी आपण पत्र लिहिले होते. पण त्यावेळी कोणीच सोबत उभा राहिला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही मोदींना घाबरत नसाल, तर तुम्ही यात सहभागी होऊ शकता, असे आवाहनही त्यांनी शरद पवारांना केले. सामान्य माणसाला फसवू नका प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना भेटण्याच्या शरद पवारांच्या दाव्यावरही सवाल केला. “राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवली जाते. शरद पवारांसोबत दोन माणसे कोण होती, त्यांची नावे जाहीर करू शकता. सामान्य माणसाला फसवू नका. जिथे लढायचे तिथे लढायचे नाही, अशी या आघाडीची स्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मंडल यात्रेतून राजकीय गणित साधण्याचा हेतू प्रकाश आंबेडकरांनी मंडल यात्रेवरूनही शरद पवारांवर आरोप केलेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला राष्ट्रवादीनेच विरोध केला होता. ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाणार नाही, कारण श्रीमंत मराठा हा एनसीपीचा मूळ आधार आहे. त्यामुळे या यात्रेचा हेतू ओबीसींचे कल्याण नसून राजकीय गणित साधणे आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी कार्ड दरम्यान, क्रांती दिनाच्या औचित्याने नागपूर येथून मंडल यात्रेला सुरुवात झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेची उद्घाटन केले. 52 दिवस चालणारी ही मोहीम राज्यातील कानाकोपऱ्यात फिरेल. 1992 नंतर शरद पवारांच्या कार्यकाळात मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली, हे जनतेला स्मरण करून देण्याचा प्रयत्न या यात्रेतून करण्यात येणार आहे. पक्षाकडून सांगण्यात आले की, मागील 50 वर्षांत शरद पवारांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या कामांचा आढावा या यात्रेद्वारे मांडला जाईल. दुसरीकडे, भाजपच्या 1990 मधील मंडल अहवालाविरोधातील भूमिकेवरही या मोहिमेतून प्रकाश टाकला जाईल. मात्र, महायुती आणि भाजपकडून या यात्रेवर सडकून टीका होत असतानाच, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.