शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड:मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर उत्तम जानकरांची सहप्रतोदपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सहप्रतोदपदी उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेत्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आज पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली. विधीमंडळातील विधानसभेचे काही सदस्य बैठकीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे विधीमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत पुढील काळात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. आज 10 पैकी 9 सदस्य बैठकीसाठी उपस्थित होते. असे जयंत पाटील यांनी सांगितले. विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्या कमी असली तरी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आमचे विधानसभेचे सर्व सदस्य चांगली कामगिरी करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाचा माहिती लपवण्याचा गुन्हा विधानसभा निवडणुकीत 5 वाजेनंतर 8 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढलेले आहे. मतदान झाल्यानंतर एवढ्या प्रमाणात मतदान वाढत असेल, तर ही चितेंची बाब आहे. याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. हे मतदान कसे वाढले, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. अतिरिक्त वाढलेल्या मतदानाची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांनंतर त्यांची वेबसाईट बंद केली. लोकांना माहिती उपलब्ध होणार नाही, याची काळजी घेतली. हा गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ईव्हीएम मशीन आपल्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले. बाबा आढावांनी केलेले उपोषण राज्यभर होईल महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देत आहे. बाबा आढाव यांनी काल जे लाक्षणिक उपोषण केले, ते महाराष्ट्रभर होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.