शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, सुप्रिया सुळे डायरेक्टर:देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

महायुती सरकारच्या काळात काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले, असा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार हे ‘फेक नरेटिव्ह’ कंपनीचे मालक आणि सुप्रिया सुळे त्या कंपनीच्या डायरेक्टर असल्याची टिप्पणी केली. पिंपरी चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी काळेवाडी फाटा येथील मैदानाव सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीला लक्ष्य केले. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फेक नरेटिव्हची फॅक्टरी चालू झाल्याचा आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत आणि महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत, असे शरद पवार रोजच सांगत आहेत. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक केंद्र आहे आणि महाराष्ट्रात 52 टक्के गुंतवणूक आली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 13 उद्योग मविआच्या सत्ताकाळात बाहेर गेले पुढे बोलताना फडणवीस यांनी सुप्रिया सुळे या ‘फेक नरेटिव्ह कंपनी’च्या डायरेक्टर आहेत. हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित होत असल्याचे सुळे यांनी खोटे सांगितले, असेही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर फेक नरेटिव्ह निर्माण केल्याचा आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले की, फक्त 16 आयटी उद्योग हिंजवडी आयटी हबमधून बाहेर गेल्या आहेत, परंतु त्या महाराष्ट्रातच कार्यरत आहेत. त्यापैकी 13 उद्योग महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात बाहेर गेले असून, महायुतीच्या सत्ताकाळात केवळ तीन उद्योग बाहेर गेले आहेत. तरीही सुप्रिया सुळे विनाकारण नकारात्मक नरेटिव्ह तयार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंचे पोटातील ओठावर आले
आता तर उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महायुती सरकारने लागू केलेल्या योजना बंद पाडणार. याचा अर्थ लाडकी बहीण योजना ते सर्वात आधी बंद करणार. त्यांच्या पोटातील ओठात आले आहे, असे म्हणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

  

Share