राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील दोन व्यक्तींनी त्यांना 160 जागा जिंकवून देण्याचे आश्वासन दिले होते, असे पवार म्हणाले होते. यावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 160 आमदार निवडून देण्याच्या वक्तव्याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 60 वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या पवारांना त्या दोन व्यक्तींची आठवण होत नाही, हे अनाकलनीय असल्याचेही बंब म्हणाले. आमदार प्रशांत बंब म्हणाले, अनके वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या शरद पवारांना भेटायला आलेल्या दोन व्यक्तींची नावे आठवत नाहीत. हे दोन लोक देशद्रोही आहेत. माझा विश्वास नाही की त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता आठवत नाहीत. लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला. आता सौदा जमला नसेल. राहुल गांधी, शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते. निवडणूक आयोगाने चौकशी करावी. वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करायला हवी, असे बंब यांनी म्हटले आहे. काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी मला सांगितले, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटले. स्पष्ट सांगायचे म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचे सांगितले. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केले. पुढे शरद पवार म्हणाले, त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचे होते ते राहुल गांधींच्या समोर म्हंटले. राहुल गांधी आणि माझे मत या कामात आपण लक्ष देऊ नये असे झाले. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारु असे आम्ही ठरवल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांच्या या विधानवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांचे हे वक्तव्य दुर्दैवी असल्याची टीका केली आहे.