हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवारांनी केले:सगळे पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे; राज ठाकरे यांचा लालबागमधून हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लालबाग येथे बोलत असताना पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जन्मानंतर चालू झाले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे म्हणाले, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, ग्रामीण भागातील मुले मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, मुंबई पुण्यातील मुले विदेशात जायचं बघतात. आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत. अनेक विषय आहेत, या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्याने हे लोक तुमचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून काही गोष्टींची सोय करून ठेवली आहे. शरद पवारांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे. मात्र या हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम हे प्रामुख्याने शरद पवारांनी केले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवार यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले. तुमचे मित्र, तुमचा परिवार महाराष्ट्रात जिथे कुठे असतील तिथे त्यांना सांगा किमान यातून तरी आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. मी माझ्या अनेक सभांमधून सांगितले उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजप असो, कॉंग्रेस असो, एनसीपी असो हे सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीचे राजकारण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये जसे राजकारण चालते तसे महाराष्ट्राचे होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सगळं विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, शिवसेना भाजपला मतदान केल्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि ज्यांच्या विरोधात मांडीला मांडी लाऊन बसली, केवळ त्या खुर्चीसाठी. तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही वाटला हा? स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधकांच्या सोबत जाऊन आघाडी करत सत्ता स्थापन केली, असा टोला देखील राज ठाकरे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आपल्या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आमच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

  

Share