शिंदेवर टीका करताना आदित्य ठाकरेंनी थेट लायकीच काढली:लाज वाटत नसेल तर स्वत:च्या वडिलांचे फोटो लावा; बिहार निवडणुकीसाठी हिंदी भाषेचा विषय काढल्याचा दावा
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नासिक मधील ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडलेले नाही तर उद्धव ठाकरे यांचे विचार एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडून मांडले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची लायकी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावावे, असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची मोठी लायकी नाही. कुणाल कामरा याने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आम्हीच नाही तर त्यांचेच खासदार त्यांना साप म्हटले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. बिहार निवडणुकीसाठी हिंदी भाषेचा विषय आगामी काळात बिहार आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये घडलेल्या भेटीगाठी नंतरच हिंदी भाषेचा विषय समोर आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही मराठीचा विषय काढा, आम्ही हिंदीचा विषय घेतो, असे त्यांचे ठरलेले दिसते, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मराठी हे सर्वांना आलेच पाहिजे आणि ते सक्तीचे असायलाच पाहिजे, असे आमचे मत आहे. मात्र, पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हा मुलांवर दबाव टाकत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. झाडे तोडण्याच्या निर्णयालाही विरोध शिवसेना पक्षाची दाने शकले झाल्यापासूनच शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही. मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबतही आता आदित्य ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे. इतकेच नाही तर सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही त्यांनी विरोधी दर्शवला आहे. मुंबईतील पाणी प्रश्नावर आक्रमक या संबंधीत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत पाण्याची समस्या ही एक मोठी समस्या आहे. भाजपने हा प्रश्न सोडवलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न सोडवलेला नाही. आम्ही याबद्दल निषेध केला, पण पोलिसांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले. कालच्या बैठकीत सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते हवामानाला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण आम्हाला हवामानाचे रक्षण करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.