शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आगामी 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या घटना पीठामध्ये असल्यामुळे शिवसेना चिन्ह बाबतीत असलेल्या प्रकरणाचा निर्णय आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाची स्थापना केली आहे. हे घटना पीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर 19 ऑगस्ट पासून सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे देखील या घटना पीठाचा एक भाग आहेत. त्यामुळे आता शिवसेना वादाचा निकाल आणखी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र न्या. सूर्यकांत आता घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडली आहे. घटना पिठाची सुनावणी ही 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर 10 सप्टेंबर नंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनुष्यबाण हे जुने चिन्ह गोठवून नवे चिन्ह देण्याची मागणी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे जुने चिन्ह गोठवून शिंदे यांच्या गटाला नवीन चिन्ह देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मात्र आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सध्यातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे हेच वापरणार असल्याचे दिसून येते.