एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील ईडीची नोटीस गेलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवरही संभावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक दावे केले. नेमके काय म्हणाले रोहित पवार? महायुतीमध्ये सध्या सर्व काही ऑल इज नॉट वेल सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इनकम टॅक्सच्या नोटीस गेलेल्या आहेत. स्वत: एकनाथ शिंदेंच्या परिवारातील एका व्यक्तीला सुद्धा ईडीची नोटीस गेलेली आहे. कदाचित संजय शिरसाट यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर एकाकडेच एवढ्या बॅग असतील, तर बाकींच्याकडे सुद्धा असू शकतात, असे आयकर विभागाला वाटले असेल. त्यामुळे त्यांना नोटीस गेल्या असाव्यात, असे रोहित पवार म्हणाले. नोटीस आली नसेल, तर त्यांनी तसे सांगावे आणि आली असेल, तर कशाची आली? हे देखील त्यांनी सांगावे, असे आव्हान रोहित पवार यांनी केले. भाजप शिंदेंच्या लोकांना टार्गेट करतोय कल्याणमध्ये माजी भाजपचा एक आमदार जो आता अपक्ष लढला होता. कारण शिंदेंच्या उमेदवाराला तिथे संधी दिली होती. तो आता एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या बिल्डरविरोधात आंदोलनाला बसलेला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पण अद्याप कारवाई झालेली नाही. भाजप प्लॅनिंग करून एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहेत. त्यांच्याशी निगडीत असलेले व्यवसायांना देखील लक्ष्य केले जात आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. धनुष्यबाण ठाकरेंना मिळण्याची शक्यता एकनाथ शिंदे कितीवेळ दिल्लीला गेले? मध्ये मध्ये ते साताऱ्याला त्यांच्या गावी जातात, का जातात? तर जेव्हा या तीन पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल असते तेव्हा ते जात असतात. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी लागली, त्यात धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यांना धनुष्यबाण मिळणार असेल, तर घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे. हे जर झाले, तर धनुष्यबाण आणि घड्याळावर निवडूण आलेले जे पक्ष आहेत, त्यांच्या दोन पर्याय राहतात. पहिला म्हणजे सर्व आमदार घेऊन भाजपमध्ये विलीन व्हायचे. दुसरा जेवढे आमदार आहेत, त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक होईल. …म्हणून भाजप विरोधकांना पक्षात घेतोय आमदारकीची निवडणूक अजून चार वर्षांनंतर आहे. अशा परिस्थितीत मेघना बोर्डीकर जिथून आमदार आहेत, त्यांच्याच मतदारसंघात विजय बांबर्डे यांना घ्यायचे कारण काय? कदाचित निवडणूक लागली, तर उमेदवार आपल्या हातात असावा, यासाठी सर्व पक्षांनी आपापली तयारी केली आहे. जालन्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे अर्जुन खोतकर हे आमदार आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसमध्ये असणारे गोरंट्याल हे भाजपमध्ये गेले आहेत. आत्ताच का गेले? तर कारण कदाचित निवडणूक लागू शकते. या सर्व संभावना आम्ही बोलून दाखवल्या. काहीही होऊ शकते, असे रोहित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे हे सध्या सहसा माध्यमांसमोर येत नाहीत. अजित पवारही येत नाही. ते जेव्हा येतात, तेव्हा ते आक्रमक बोलून जातात, असेही रोहित पवार म्हणालेत.