सोबत फिरायला गेल्यावर ठेवला लग्नाचा प्रस्ताव:तरुणीने दिला नकार, भडकलेल्या तरुणाने केला चाकू हल्ला
महाराष्ट्रात महिला व मुलींवरील अत्याचार त्याचसोबत हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना अकोला शहरात घडली आहे. मुलीने लग्नाला नकार दिल्याने चाकू हल्ला करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने अकोला शहर हादरले आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष डिवरे असे चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर तरुणी ही वैद्यकीय नर्स असल्याचे समजते. आकोल्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष डिवरे आणि जखमी तरुणी हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही बोरगाव मंजू परिसरात फिरायला गेले होते. फिरायला गेले असताना संतोषने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. संतोषने वादादरम्यान त्याच्या जवळील चाकूने तरुणीवर वार केले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत तरुणीची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने मात्र अकोल्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती ठाणेदार अनिल गोपाळ यांनी दिली आहे. कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी अन् सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीसह सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे, सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात हा प्रकार घडला आहे. कौटुंबिक वादातून पतीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल शिंदे (19 वर्षे) आणि अनिता शिंदे या दोघी मायलेकी घरामध्ये झोपल्या असताना त्याठिकाणी स्नेहलचा नवरा आला आणि त्याने दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जाळण्याचा प्रयत्न करणारा पती केदार हंडोरेही या आगीत जखमी झाला आहे. हेही वाचा