परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला मान्यता दिली आहे. याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. या निर्णयाचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वागत केले आहे. तसेच दोघांनी या प्रकरणातील आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली होती. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? राहुल गांधी ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी सोमनाथ यांच्या आईंनी संपूर्ण परिस्थिती टाहो फोडून सांगितली होती. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला, असा निष्कर्ष काढला. त्यावेळेस मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे प्रमुख म्हणत होते की, सोमनाथला अनेक आजार होते. त्याचा श्वास गुदमरला गेला. हे लोक बहाणेबाजी करून पोलिसांना का वाचवत होते? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. चुकीचे वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करायला पाहिजे होती. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी ज्यावेळेस जे काही सांगितले होते, तेच आता सत्य झाले आहे. सुप्रीम कोर्टानेही ते मान्य केलेले आहे. त्यामुळे त्यावेळी चौकशी मध्ये असणाऱ्या सर्व वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. आम्ही विधानसभेच्या पटलावर खोटे बोलत नसतो – आव्हाड सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो, आम्ही विधानसभेच्या पटलावर खोटे बोलत नसतो. सोमनाथ सूर्यवंशीचे प्रकरण पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरले. आम्ही सांगत होतो की, सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच करण्यात आली. सरकार सारवासारव करत होते. श्वासोच्छवासाचा त्रास झाला, अमुक झाले, तमुक झाले. पहिल्यांदा उच्च न्यायालयाने ते खोटे ठरवले आणि आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. … पोलिस उद्या कोणालाही मारतील गुन्हेगारांना सरकारने पाठिशी घालावे, असे काही प्रकरण नव्हते. एका भांडी घासणाऱ्या गरीब आईचा एकुलता एक, घरातील कर्ताकरवीता, शिकलेला सावरलेला, पुरोगामीत्व आणि आंबेडकरी विचारांचा खंदा समर्थक सोमनाथ सूर्यवंशी याचा काय गुन्हा होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. आईचा आधार म्हणून पुढे-मागे उभा राहणाऱ्या या मुलाला तुम्ही यमसदनी पाठवले. हा गुन्हा नाही? या गुन्ह्याची शिक्षा व्हायला पाहिजे. जर असेच होत राहिले, तर पोलिस उद्या कोणालाही मारतील, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ही राज्यव्यवस्था लोकशाही माध्यमांतून संविधानाला मानून चालली पाहिजे. हे पोलिसी राज्य होता कामा नये. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि हे ही सांगू इच्छितो विधानसभेत आम्ही जे बोलतो, ते सत्यच बोलतो. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.