सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या:आझाद मैदानावर आंदोलक आक्रमक, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा- विजय वडेट्टीवार
परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवा यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात करण्यात येत असून आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. मंत्रालयात हे आंदोलक जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र यावेळी गेट बंद करण्यात आल्याने आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आझाद मैदानात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आझाद मैदानातून विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलक मंत्रालायकडे जात असताना पोलिसांनी गेट बंद केले असून बाहेरच्या बाजूने देखील बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सरकार घाबरून आहे. जनतेचा सामना करू शकत नाही म्हणून पोलिसांना इथे उभे करून हे काम करत आहेत. या सरकारला अधिवेशनात धडा शिकवणार. अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत. तसेच सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला असून जेवढे पोलिस यात होते त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा सोमनाथ सूर्यवंशीचा आणि विजयचा खून आहे. पोलिस कोठडीत असताना हा खून झाला आहे. याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच आंदोलक आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसले. सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलकांनी हे आंदोलन सुरू केले होते. कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील सकाळी आंदोलकांची भेट घेतली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन याठिकाणी त्यांनी भाषण देखील केले. यावेळी मंत्रालयात चालून जाणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.