लांब आणि मध्यम अंतराच्या एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाने 150 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 1 जुलैपासून सर्वसामान्यांसाठी लागू होणार असून, दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या काळात मात्र ती लागू राहणार नाही. ही सवलत फक्त पूर्ण तिकीट धारक प्रवाशांनाच मिळणार असून सवलत धारक योजनेच्या प्रवाशांना ती लागू होणार नाही. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देत प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 1 जूनला एसटी महामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. आषाढी, गणपतीसारख्या सणांमध्ये सवलतीचा लाभ एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ भाविक व चाकरमान्यांना मिळणार आहे. येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या नियमित बस गाड्यांचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या भाविकांना तिकीट दरात 15 टक्के सवलत मिळेल. मात्र, सणासुदीच्या काळात चालवण्यात येणाऱ्या अतिरिक्त (जादा) गाड्यांना ही सवलत लागू असणार नाही. त्याचप्रमाणे गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही ही सवलत लागू होणार आहे, त्यासाठी आगाऊ आरक्षण अनिवार्य आहे. ई-शिवनेरी प्रवाशांनाही दिलासा मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘ई-शिवनेरी’ या एसटीच्या वातानुकूलित बस सेवा घेणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना ही सवलत मिळेल. त्यासाठी प्रवाशांनी एसटीचे अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com किंवा ‘MSRTC Bus Reservation’ हे मोबाईल अॅप वापरून आरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाडेवाढीनंतरचा दिलासा काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने 15 टक्के भाडेवाढ लागू केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, आता लागू होणाऱ्या 15 टक्के सवलतीच्या योजनेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवासी संख्येत वाढ होते का? याकडे महामंडळाचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका:एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या, मराठी माणसाच्या उद्धारासाठी सर्वकाही करण्याचा निर्धार मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…