सुनील टिंगरेंनी पवारांना पाठवलेली नोटीस सुळेंनी आणली समोर:सत्तेतील लोक धमक्या देत असल्याचा केला आरोप

पोर्शे कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांनी नोटीस पाठवली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केला होता. यानंतर मी शदर पवारांना कोणतीही नोटीस पाठवले नसल्याचे सुनील टिंगरे यांनी सांगितले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज सुनिल टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस पत्रकार परिषदेत सर्वांसमोर दाखवली. राजकारणात सध्या सत्तेत असलेल्या लोकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. वडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी पवार साहेबांना नोटीस पाठवली, म्हणून सुप्रिया ताई सुळे खोटे सांगतायत. सहानुभूतीसाठी ताईचा खटाटोप चालू आहे. साहेबांना काय नोटीस पाठवली हे ताईने महाराष्ट्राला दाखवावे, असे आव्हान अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत ती नोटीस सर्वांना दाखवली. धनंजय महाडीक आणि भाजपचा घेतला समाचार सुप्रिया सुळे यांनी धनंजय महाडिक यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय महाडीक यांची केलेल्या विधानाचा मी निषेध करते. महाराष्ट्रातील महिलांना धमकी देण्याची हिंमत होतेच कशी? महिलांना अशा प्रकारच्या धमक्या देणे खपवून घेणार नाही. कोणतीही महिला कोणत्याही पक्षाच्या सभेला किंवा प्रचाराला जाऊ शकते. संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे. भाजप स्वत:च्या खिशातून पैसे देत नाही. जर राजकीय सुडापोटी त्या महिलांचा कोणताही शासकीय निधी बंद केला, तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला आहे. धनंजय महाडीक यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाने देखील दखल घ्यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. नेमके प्रकरण काय?
सुप्रिया सुळे यांनी बापू पठारे यांच्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा गौप्यस्फोट केला होता. ‘पोर्शे कार दुर्घटनेत ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत. इथल्या स्थानिक नेत्यांनी पोर्शे कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली, तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. अशी नोटीस पोर्शे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत करणाऱ्या नेत्यांनी शरद पवार यांना पाठवली, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण
माझ्याकडून साहेबांना कोणतीही नोटीस बाजवण्यात आलेली नाही. मध्यंतरी एका प्रकरणात अनेक पार्टीचे नेते लीडर आणि प्रवक्त्यांनी माझ्यावर अनेक वक्तव्य केले त्यातून माझी बातमी करण्यात आली, लोकांमध्ये गैरसमज तयार करण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने चुकीचा प्रचार होऊ नये या हेतूने मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना नोटीस देऊ आपण शहानिशा न करता चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावर कुठल्याही वक्तव्य करू नये अशा पद्धतीची नोटीस मी त्यांना दिली आहे. वैयक्तिक साहेबांना कोणतीही नोटीस दिली नाही, असे स्पष्टीकरण सुनील टिंगरे यांनी दिले होते.

  

Share