सुनेवर विजेचा शॉक देऊन हल्ला:नागपुरात सासू-सासऱ्याकडून टीसीएस कर्मचारी तरुणीवर प्राणघातक हल्ला; पतीच्या परस्त्री संबंधांमुळे वाद

नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला विजेचा शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे ही घटना घडली. टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या प्रीती स्वप्निल चिव्हाणे (35) यांच्यावर त्यांचे सासरे भानुदास चिव्हाणे (65) आणि सासू माया चिव्हाणे (63) यांनी हल्ला केला. सध्या प्रीती यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रीती यांचा पती स्वप्निल वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय करतो. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र एक वर्षापूर्वी स्वप्निलचे परस्त्रीशी असलेले संबंध प्रीतीच्या लक्षात आले. त्यांनी हा विषय कुटुंबीयांसमोर मांडला. नातेवाईकांनी स्वप्निलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून चिव्हाणे कुटुंबीयांकडून प्रीतीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. १ मार्चला प्रीतीने पोलिसांत तक्रार केली. याचा राग धरून १० मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास कामावरून घरी आलेल्या प्रीतीला सासऱ्यांनी शिवीगाळ केली. प्रीती वरच्या मजल्यावर जात असताना सासू-सासऱ्यांनी तिचा हात पकडून विजेचा शॉक दिला. घाबरलेल्या प्रीतीने स्वतःची सुटका करून घेतली. मात्र दोघांनी तिचे केस पकडून तिला खाली ओढले आणि मारहाण केली. तिच्या आरडाओरडीने धावून आलेल्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  

Share