मुंबईत एका 14 वर्षीय मुलीवर दोघांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. यानंतर आता लोणावळ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापाने घरी मुलगी एकटे आहे याचा गैरफायदा घेत स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि याबद्दल कुणाला काही सांगू नको अशी धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्याच्या जवळील कुसगावमध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना बापाने तिच्यासोबत गैरकृत्य केले. या घटनेची माहिती कुणाला दिलीस तर ठार मारेल अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले? 20 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरी एकटी आहे याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला. घटनेची माहिती कुणाला सांगू नको यासाठी देखील आरोपीने मुलीला धमकी दिली होती. पण आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिला सांगितला. हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत. हे ही वृत्त वाचा मालवणीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार:अश्लील व्हिडिओ आईला पाठवल्याने प्रकार उघड मुंबईच्या मालवणी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मुलीवर दोन जणांनी धमकी देत अत्याचार केला. 6 जून रोजी पीडितेची ती अश्लील क्लिप तिच्या आईला पाठविण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या नंतर त्यांनी मालवणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.