अमरावती खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या पीक कर्ज वाटप मोहिमेमध्ये ३१ जुलै २०२५ पर्यंत ७५ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख २५ हजार खातेदारांसाठी १६५० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी ८७ हजार ८२० खात्यांमध्ये १२३४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरिपासाठी २१ बँकांना १६५० कोटी रुपयांचे पीकर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक वाटप सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केले असून त्यांनी एकूण ५५८ कोटी ७ लाखांचे कर्ज वाटप करून ७५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ११,८६८ खातेधारकांना १९२ कोटी ७२ लाखांचे पीक कर्ज दिले. बँक ऑफ इंडियाने १२९ टक्के वाटप करून लक्षवेधी कामगिरी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने ६८ तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ९० उद्दिष्ट पूर्ण केले आहे. खासगी बँकांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण या बँकांमध्ये कर्जवाटपात उदासिनता दिसून येत आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप योग्यवेळी झाल्यास शेतकऱ्यांना पेरणीत मदत होईल. जिल्हा बँकेचे ८४% पीककर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४७ हजार ९२७ शेतकऱ्यांना ६३१ कोटी ९५ लाखांचे कर्ज वितरित केले. त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५१ टक्के वाटप करून १० कोटी ६७ लाख रुपयांचे वितरण केले. या खासगी बँकांची कामगिरी निराशाजनक खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी मात्र अत्यंत निराशाजनक ठरली आहे. ८ खासगी बँकांनी मिळून फक्त ३३ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. याची टक्केवारी २६ टक्के एवढी आहे. ॲक्सिस बँक २ टक्के, एचडीएफसी ५४ टक्के, आयसीआयसीआय ३८, आयडीबीआय बँकेने २३ टक्के तर अनेक बँकांनी अद्याप वाटपच सुरू केलेले नाही.