तनिषा भिसे मृत्यू प्रकरण:मेडिकल काऊन्सिलच्या सुनावणीत डॉ. घैसास गैरहजर, भिसे कुटुंबीयांनी पुरावे सादर करत केली मोठी मागणी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची मेडिकल काऊन्सिल येथे सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीला भिसे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी काऊन्सिलपुढे त्यांच्या जवळ असलेले सर्व रिपोर्ट आणि पुरावे सादर केले. याच सोबत भिसे कुटुंबीयांनी काही महत्त्वाच्या मागण्या देखील काऊन्सिलसमोर केल्या आहेत. या सुनावणीला मात्र डॉ. सुश्रुत घैसास उपस्थित नव्हते. त्यांनी ईमेलद्वारे येऊ शकत नसल्याचे मेडिकल काऊन्सिलला कळवले होते. मेडिकल काऊन्सिल येथे झालेल्या सुनावणीनंतर भिसे कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही आज सुनावणीसाठी आलो होतो. तनिषा भिसे यांची खोटी माहिती प्रसारित करण्यात आली होती, त्याबद्दल आम्ही माहिती दिली आहे. आम्हाला आता पुढच्या सुनावणीसाठी बोलावले आहे. यावेळी डॉ. घैसास उपस्थित नव्हते. त्यांचे मेडिकल लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच ट्रस्टच्या प्रशासनावर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कुठल्याही कुटुंबाला अमानविय त्रास सहन करावा लागू नये, अशा मागण्या आम्ही काऊन्सिलसमोर केल्या आहेत. पुढे बोलताना भिसे कुटुंबीय म्हणाले, काऊन्सिलकडून जे काही प्रश्न विचारले त्याला आम्ही प्रत्येक गोष्टीत पुरावे सादर केले आहेत. मात्र, काऊन्सिलकडून आश्वासन देण्यात आले नाही, डॉ. घैसास यांना अटक व्हावी, ही आमची प्राथमिक मागणी आहे. तसेच आम्ही काऊन्सिलला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तनिषा भिसे यांच्या आई दुर्गा रुद्रकर यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, ती मुलगी माझी होती. डॉक्टरांनी केले ते योग्य नाही. आज माझ्या मुलीचा जीव गेला आहे. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आहे. यावेळी तनिषा भिसे यांच्या नणंद प्रियंका पाटील म्हणाल्या, आम्ही सर्व पुरावे काऊन्सिलला दाखवले आहेत. आम्हाला खात्री आहे की सत्याचा विजय होईल. डॉ. सुश्रुत घैसास अनुपस्थित मेडिकल काऊन्सिल येथे झालेल्या आजच्या सुनावणीला संबंधित डॉ. सुश्रुत घैसास अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी ईमेलद्वारे कळवले होते. त्यात म्हटले होते की, मी सुनावणीला येऊ शकत नाही. आम्हाला जर पुन्हा बोलावले तर आम्ही बाजू मांडण्यासाठी येऊ. काऊन्सिलपुढे आम्ही आमच्या जवळ असणारे सर्व रिपोर्ट आणि पुरावे ठेवले आहेत. हॉस्पिटल ट्रस्टकडून चुकीचे पुरावे दाखवले गेले, हे आम्हाला निदर्शनास आले आहे. त्याबाबत आम्ही आमचा अंतर्गत अहवाल सादर केला आहे, त्यावर कारवाई व्हावी, असे कळवण्यात आले आहे.