शिक्षक शब्दालाचा काळिमा फासणारी घटना:पांढरी टोपी का नाही घातली म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, दोघांवर होणार कारवाई
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिक्षकांच्या भांडणांमुळे चर्चेत आली आहे. शिक्षकांनी एकमेकांवरचा राग चक्क एका विद्यार्थ्यावर काढला आणि पांढरी टोपी का नाही घातली म्हणून बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अज्ञानाचा अंधार दूर करणारा गुरु असतो, त्याच शब्दाला शिक्षक काळिमा फासण्याचे काम करीत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून त्या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. तेथील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक धनपाल राऊत, प्रभाकर वाळके, बादल धाबर्डे व आणखी एक असे चार शिक्षक शिकवतात. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपसामध्ये वाद निर्माण करतात आणि त्या वादाचे रूपात भांडणांमध्ये होत असल्याचे चित्र ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक ९ जानेवारी रोजी तात्काळ शिक्षकांची बदली करण्यात यावी, अशी तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. तोच प्रकार दिनांक २९ जानेवारी रोजी घडला आणि तो राग प्रभाकर वाळके नामक शिक्षकाने चक्क एका विद्यार्थ्यांवर काढला. पांढरी टोपी का परिधान केली नाही असे बोलून एका विद्यार्थ्याच्या हातावर पाय देऊन बेदम मारहाण केली. तर दुसऱ्या विद्यार्थ्याला बेंचवर उभा करीत मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. शिक्षक अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करत असतील तर विद्यार्थी शाळेत कसे जाणार, असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहेत. त्या दोन शिक्षकांवर योग्य कारवाई केली जाणार वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी नीतू गावंडे म्हणाल्या, बोपापूर येथील शाळेत दोन शिक्षकांमध्ये आपसात वाद होत होता. त्या वादाचा राग ते दोन शिक्षक विद्यार्थ्यांवर काढत होते. याप्रकरणी केंद्रप्रमुखांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोन शिक्षकांवर योग्य कारवाई केली जाणार, असे अश्वासन त्यांनी दिले आहे.