हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या वतीने ५ जुलै रोजी मुंबई भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पाठिंबा दिला असून, मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाला राष्ट्रवादी अजित पवार गट पाठिंबा देणार का? पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, या मोर्चात आमच्या पक्षाचा कोणताही नेता सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक हिंदी सक्तीला विरोध करत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या वर्गात हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी असावी. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता, वाचता यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यामुळे ५ जुलैच्या मोर्चात अजित पवारांचा पक्ष देखील सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट विधान केले आहे. नेमके काय म्हणाले सुनील तटकरे? ५ जुलैच्या मोर्चात आमच्या पक्षाचा कोणताही नेता सहभागी होणार नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. हा विरोधकांचा मोर्चा आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला जर या विषयावर काही मांडायचे असेल, तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तो मार्ग शोधू, असेही ते म्हणालेत. शरद पवारांच्या पाठिंब्यावर तटकरे काय म्हणाले? शरद पवार यांच्या पक्षाने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता, मला याबाबत काहीच बोलण्याचे कारण नाही, राज्यातल्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे. असे असताना जर का कोणाला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्या पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ, असे त्यांनी म्हटले. मोर्चामुळे राजकीय समीकरणे बदलणार नाहीत ५ जुलैच्या मोर्चामुळे मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन महायुतीला फटका बसेल का? असा प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले, मी या मोर्चाकडे राजकीय चष्म्यातून बघत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, या मोर्चामुळे राजकीय समीकरणे फारशी बदलणार नाहीत, असे मला वाटते. हे ही वाचा… मी मराठीत बोलणार, हिंदीत बोलणार नाही:मंत्री अशोक उईके यांच्या विधानाची चर्चा; देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून मोठे आकांडतांडव माजले आहे. या प्रकरणी सरकार व विरोधकांत कमालीची राजकीय चिखलफेक होत असताना आता भाजपच्याच एका मंत्र्याने महायुती सरकारला घरचा आहेर दिल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्यावर मराठीचे संस्कार झाल्यामुळे आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा…